नमस्कार मंडळी
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.
स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.
दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक नागाची पूजा करतात. वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे, तर भगवान विष्णू शेषनागाच्या पलंगावर झोपलेले असतात. धार्मिक मान्यतेनुसार, पृथ्वीचे वजन शेषनागाने पेलले आहे, तर वासुकी ही समुद्रमंथनाच्या वेळी मजबूत दोरी होती, त्यामुळे समुद्रमंथन झाले, त्यातून अमृतासह अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्रीहीन देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला.
यंदा हिंदू कॅलेंडरनुसार, नागपंचमीसाठी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १२:३७ वाजता सुरू होईल आणि ही तिथी शनिवारी १० ऑगस्ट रोजी पहाटे ३:१४ वाजता समाप्त होईल. सूर्योदयाच्या तिथीनुसार यंदा नागपंचमी शुक्रवारी 9ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. नागपंचमी बद्दल बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये. कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये.
पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग, साप यांची विश्रांतीस्थाने असतात. अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये, म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे. ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते. त्यादिवशी जशी शेतकामाला सुटी तशीच गृहीणीलाही रोजच्या रांधा, वाढा, उष्टी काढा या कामातून सुटी देण्याच्या हेतूने भाजू, चिरू नये असा नियम केला असावा. ती स्वत:साठी सुटी कधीच घेत नाही, अशा निमित्ताने तिला थोडा आराम, हा त्यामागील मूळ हेतू आहे.
हिंदू धर्मात देवीदेवतांची पूजा-अर्चा करण्यासाठी व्रतवैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरूवात झाली. तसंच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात. नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे. तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे. लोकजीवनातही भारतीयांचं नागांशी पूर्वीपासून दृढ नातं आहे.
याच कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते. खरंतर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्याही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे. कारण शेतातील उंदरी-घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होत नाही.
तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच, पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात. कुंडली दोषांमध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे. कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात. त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दान दक्षिणा देण्याचंही महत्त्व सांगितलं जातं.
शास्त्रांनुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. याशिवाय प्रत्येक महिनाच्या पंचम तिथीला नागदेवतेचं स्थान आहे. परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः केली जाते. या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो. श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासासोबत साजरं केलं जातं.
नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारणं सांगितले जातात. नाग हा महादेवाला प्रीय होता. महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते. नागपंचमीला नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्पदोष दूर होत असल्याचे सांगितले जाते. तसच काहीसं अर्जूनाचा नातू राजा परीक्षितचा मुलगा जन्मजेय यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नागांचा कूळ संपवण्यासाठी यज्ञ केला.
कारण त्याच्या वडिलांना तक्षक सापाने मारले होते. ऋषी जरत्कारूचा मुलगा आस्तिक मुनीला ही बाब माहीत होताच त्यांनी नागाचे कूळ वाचवण्यासाठी यज्ञ थांबविला. हा यज्ञ श्रावण महिन्याच्या शुक्ल पंचमीला थांबवला होता. तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमी बद्दल अजून एक गोष्ट खूप प्रचलित आहे ती म्हणजे एकदा एक शेतकरी जमीन नांगरीत असतना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला.
त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी, तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती.
मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वत: ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला सात मुलगे होते. त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता. एकदा तिने एका सापाला मरताना वाचवले. त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितले तेवढे धन दिले.
त्यामुळे ती अधिक सुखी समृद्ध जीवन जगू लागली. आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही. नागपंचमी विषयी माहिती वाचल्यास तुम्हाला कळेल की, फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे.