नमस्कार मंडळी
कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्री देवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.
कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते. बहुतांश लोकांना काही जणांना वाटत कुळ म्हणजे जात. तर ते चुकीच आहे.
कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात. कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते. कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवलं जात. पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा.
जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते. कुटुंबकबिला वाढला की त्याला कुळ म्हणत असावेत . अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी. महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची आईभवानी, कोल्हापूरची अंबाबाई असलेल आढळत. आपल्या पूर्व कर्मानुसार आपण विशिष्ट कुळात जन्म घेतो .
प्रत्येक कुळाची एक देवता असते जिला आपण कुलस्वामिनी आणि कुल दैवत असे म्हणतो. आपल्या घराण्याचे कुलदैवत कुठले आहे हे प्रत्येकाला माहित असलेच पाहिजे . माहित नसेल तर माहित करून घेतले पाहिजे. हिंदू धर्मात अनेक रूढी परंपरा प्रथा आहे त्याची जपणूक आणि त्याचा वारसा पुढील पिढीला सुपूर्द करणे आपले परम कर्तव्य आहे पण त्याआधी आपल्याला ह्या गोष्टींचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणे आवश्यक आहे.
आजकाल आपले गोत्र कुठले आहे हेही अनेकांना माहित नसते तसेच आपले मूळ गाव आणि दैवत हेही माहित नसते. जर तुमची श्रद्धा ब्रम्हावर, विशुवर, महेशवर असेल किंवा आदिमायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा, त्यांची सेवा करा, त्यांची श्रद्धा करा, त्यांच्या नामाचा जप करा, तरी आपली सेवा कुळदैवताला लागते. आणि त्यांची कृपा होते. या दोन गोष्टी आहेत,आत्ता तुम्हाला काय करायचे हे तुम्ही ठरवा.
म्हणजे तुम्हाला कुलदैवत माहीत असेल किंवा या मार्गातून माहीत होईल. तर, वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन नक्की घ्यावे. याने घरात शांती, सुख समृध्दी राहते. घरातून आजार, तिजार दूर राहतात. कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात.
आपण आपल्या कुलस्वामिनीचे नित्य पूजन आरती केली तर आपल्या घरातील मुली येणाऱ्या सुना ह्यानाही त्याची माहिती होईल आणि गोडीही लागेल. आपण म्हणतो कि आमच्या सुना करणार नाहीत त्या आधुनिक आहेत त्यांना वेळ नसतो .पण मला हे अजिबातच पटत नाही कारण त्या आधुनिक असतील पण तुम्ही तरी त्यांना कुठे आपल्या रिती ,आपल्या परंपरा समजून सांगितल्या आहेत? त्या करणार किंवा करणार नाहीत हे गृहीत धरणे कितपत योग्य आहे? बघा विचार करा नक्कीच पटेल.